हातकणंगले (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी कष्ट व स्वावलंबन हे गुण अंगीकारून स्पर्धेच्या युगात ज्ञान संपन्न होऊन, मोठ्या पदावर आरूढ व्हावे, असे मत जयसिंगपूर विभागातील निर्भयापथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव सणगर यांनी व्यक्त केले.

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील नोबेल/पृथ्वी पब्लिक स्कूल या निवासी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषक वितरण समारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून सणगर हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. एन. पाटील उपस्थित होते. स्वागत संस्थेचे अध्यक्ष घनशाम निंबाळकर यांनी, तर प्रास्ताविक शिक्षक एम. एस. बन्ने यांनी केले. विद्यार्थ्यांनी चित्तथरारक ग्रामीण मर्दानी खेळ व स्केटिंगची प्रात्यक्षिके करून पाहुण्यांना मानवंदना दिली.

लक्ष्मणराव सणगर म्हणाले, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. यासाठी पालक आणि शिक्षकांनी जागरूकपणे विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. सध्या मुलींची छेडछाड, रॅगिंग, हुल्लडबाजी असे प्रकार वाढले आहेत. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष करून मुलींनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करावी. यासाठी निर्भया पथक काम करत आहे. पोलिसांना शत्रू न मानता मित्र म्हणून सहकार्य करावे तरच कायदा सुव्यवस्था राखणे सोयीचे ठरणार आहे.

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास संस्थेच्या सचिवा तेजश्री निंबाळकर, मुख्याध्यापक बी. जी. जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख व्ही. पी. बनकर, जिल्हा शेतकरी संघाचे व्यवस्थापक सारंग पाटील, अतिग्रे येथील वारकरी संप्रदायाचे सचिव माणिक निंबाळकर, भाजप कार्यकर्ते कुमार जाधव, शैलेंद्र पाटील, वैशाली पाटील यांच्यासह सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी पाटील (अतिग्रे) यांनी केले. मुख्याध्यापक जाधव यांनी आभार मानले.