गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील नोकरी निमित्य गोव्यात असणाऱ्या तरुणाचा रविवार (दि. ४) रोजी सायंकाळी समुद्रात बुडून अंत झाला होता. अनवश शौकत ताशिलदार (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी सापडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनवश हा गेल्या तीन वर्षापासून गोवा येथील एका कंपनीत नोकरीला होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनवश आणि त्याचे दोन मित्र सायंकाळच्या सुमारास वाजता उथवडा बीचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्राच्या पाण्याचा  आणि लाटेचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. त्यातील एक तरुण बाहेर आला. यावेळी गोवा पोलीसांनी शोध मोहीम राबवली पण त्यात त्यांना यश आले नाही. काल (सोमवार) रात्री आठ वाजता मुस्‍तकीम शेख (रा. गोवा) याचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. तर अनवशचा मृतदेह आज सकाळी अकरा वाजता सापडला.

अनवशचा असा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबासह हलकर्णीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.