कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते. साधारण 750 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले. यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला.

यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कि, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान आणि पी एम किसान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी चे निराकरण करा. नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांबाबत त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयात जावे लागू नये, यासाठी निकाली न निघणाऱ्या अर्जांबाबत कारण नमूद करुन अर्जदारांना लेखी स्वरुपात अवगत करा, असे त्यांनी सांगितले.