कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन संघांमध्ये रविवारी अटीतटीची लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला. आता या दोघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होत आहे. 

अंतिम सामन्यापूर्वी लिओनेल मेस्सी फिट नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप फायनलपूर्वी सराव सत्रात भाग घेतला नव्हता. त्याला हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला त्रास होत होता. त्याला सेमीफायनलपूर्वीच्या सामन्यातही हा त्रास जाणवला होता.

क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लिओनेल मेस्सीला त्रास जाणवू लागला होता, पण त्यानंतर तो म्हणाला की मला बरे वाटत आहे, मी सर्व प्रकारे तयार आहे आणि विश्वचषकात माझ्याकडून संघाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. विशेष म्हणजे मेस्सी अनफिट असल्याची बातमी येताच चाहत्यांमध्ये तणाव वाढला होता. लिओनेल मेस्सीला आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्याची संधी आहे. लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक आहे आणि हा अंतिम सामनाही अर्जेंटिनासाठी त्याचा शेवटचा सामना असू शकतो.

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या २२ व्या हंगामात एकूण ४४० दशलक्ष डॉलर्संची रक्कम बक्षीस म्हणून वितरित केली जाईल. मागील हंगामापेक्षा ही रक्कम ४० दशलक्ष डॉलर्स अधिक आहे. यावेळी ट्रॉफी व्यतिरिक्त, फिफा विजेत्या संघाला ४२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४४ कोटी भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाईल. त्याच वेळी उपविजेत्या संघाला ३० दशलक्ष डॉलर (सुमारे २४५ कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून दिले जातील.

तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला २७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२० कोटी भारतीय रुपये), चौथ्या क्रमांकाच्या संघाला २५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २०४ कोटी भारतीय रुपये) आणि ५ ते ८ या क्रमांकावर असलेल्या संघांना १७ मिलियन डॉलर्स (सुमारे १३८ कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत.