कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिक्षण केवळ सातवीपर्यंतचे….चालक म्हणून काम….ब्लेझरसोबत गळ्यात, हातात सोने…अलिशान मोटारीतून रूबाब…अल्पावधीत ‘गोल्डन मॅन’ अशी ओळखही मिळवली; परंतु गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या या एजंटाचा रुबाब अखेर पोलिसांनी उतरवला. ‘ए. एस’ ट्रेडर्सचा मुख्य एजंट म्हणून कोट्यवधींची माया मिळविणाऱ्या संदीप लक्ष्मण वाईंगडे ऊर्फ गोल्डन मॅन (वय ३९, रा. पाटील गल्ली, उचगाव) याला पोलिसांनी अटक केली.

त्याच्याकडील १० लाखांची मोटार जप्त केली, तर १३ तोळे सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ए. एस. ट्रेडर्स आणि त्यांच्या उपकंपन्यांत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार याच्यासह संचालक, एजंटांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत ३८ जणांविरोधात गुन्हा दाखल असून, १९ संशयितांना अटक झाली आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या मालमत्ता, मोटारी जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

‘गोल्डन मॅन’ बनला कोट्यधीश

ए. एस. ट्रेडर्सचा मुख्य एजंट म्हणून त्याने लोकांकडून पैसे घेतले होते. चालक म्हणून काम करणाऱ्या संदीप वाईंगडेने स्वतःचे केवळ १२ लाख गुंतवले होते. त्याला तब्बल एक कोटींचा नफा मिळाल्याचे तपासात समोर आले. याच पैशांतून त्याने आलिशान मोटार खरेदी केली होती, तर लोहितसिंग याने दिलेले १३ तोळे दागिने अंगावर घालून तो मिरवत होता.

सोन्यावर उचलले कर्ज…

संशयित वाईंगडे याने त्याचे सोने सध्या बॅंकेत गहाण ठेवले होते. त्याआधारे त्याने कर्ज उचलल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी बॅंकांशी पत्रव्यवहार केला असून, हे सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मालमत्ता शोधून काढणार…

एजंट वाईंगडेला यापूर्वी दोन वेळा हजर राहण्याची नोटीस बजावली होती; परंतु तो पोलिसांत हजर झाला नव्हता. पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. न्यायालयाने त्याला ११ जुलैपर्यंत कोठडी दिली. जप्तीसाठी त्याच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे.