मुरगूड (प्रतिनिधी) : आपण या समाजाचे देणे लागतो अशी मानसिकता मनाशी बाळगून निःस्वार्थी सेवाभाव जोपासत चंदगड तालुक्यातील आसगोळी येथील देवमामा पांडुरंग गुरव यांनी मुदाळ येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेला तब्बल दोन लाखांची देणगी दिली आहे. या आधी त्यांनी येथील प्राथमिक शाळेला देखील देणगी दिली आहे. गुरव यांनी आई यल्लमा देवीचा जोगवा मागून जमा केलेल्या रकमेतील ही देणगी देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

मुदाळ येथील विद्या मंदिर शाळेला या देणगीतून मैदाना बरोबरच शैक्षणिक साधनसामग्री, ग्रंथालय, इतर सुविधा उपलब्ध करण्याचा मानस शाळा व्यवस्थापनाने केला आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण लाभणार आहे. याबद्ल गुरव यांचा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.