कतार : फिफा विश्वचषकात घाना आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्यात घानाने दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला. मात्र, दक्षिण कोरियाविरुद्धच्या विजयानंतर घानाने राउंड ऑफ-१६ मध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाविरुद्ध घानाच्या विजयाकडे एक उलटफेरा म्हणून पाहिले जात आहे. कारण फिफा रँकिंगवर नजर टाकली, तर दक्षिण कोरियाचे फिफा रँकिंग २८ आहे, तर घाना ६१ व्या स्थानावर आहे. 

दक्षिण कोरियाचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत होता. घानाने उत्तम पद्धतीने डिफेंड करत दक्षिण कोरियाला गोल डागण्याची एकही संधी दिली नाही. अशातच २४ व्या मिनिटाला संधी साधत घानाच्या मोहम्मद सलिसूने एक गोल डागत संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ३४ व्या मिनिटाला मोहम्मद कुदुसने गोल डागला. त्यानंतर सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत असलेल्या दक्षिण कोरियाने तीन मिनिटांत दोन गोल डागत सामना बरोबरीत आणला. दक्षिण कोरियाने ५८ व्या आणि ६१ व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियाचे दोन्ही गोल चो ग्युसांगने हेडरवर केले. त्यापाठोपाठ घानाने आणखी एक गोल डागत विजयाला गवसणी घातली.