मुंबई (प्रतीनिधी) :  राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना हवामान विभागाने मात्र वातावरणात गारवा येण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात हवेत अचानक बदल झाला आहे. मुंबईत तापमान घसरल्याने काही प्रमाणात थंडी पसरल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत रात्रीचे तापमान सुमारे २५ अंश सेल्सिअस नोंदवले जात होते. दरम्यान आठवडाभरात मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवलेले किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा वेधशाळेत २३.२ अंश सेल्सिअस होते. ख्रिसमस वीकेंडमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता असल्याचे अधिकारी आणि हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.