नाशिक : आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुलच्या घरांची झाडाझडती सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि धुळ्यातील बागुल यांच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. बागुलच्या दोन घरांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे. त्याच्या इतर घरांमधील आणि लॉकरमधील रोख रकमेची मोजदाद अद्याप बाकी आहे.

आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिनेश बागलशी संबंधित मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी टाकल्या आहेत. आतापर्यंत कोट्यवधींची रोकड सापडली आहे. बागुलने रोख, सोने, बेनामी संपत्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय एसीबीला आहे. बागुलशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारीदेखील एसीबीच्या रडारवर आहेत. बागुलच्या घरांमध्ये सापडलेली रोख रक्कम मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचे मशीन मागवले आहे.

दिनेश कुमार बागुलला काल संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. २८ लाख रुपयांची लाच घेताना बागुल एसीबीच्या जाळ्यात सापडला. सेंट्रल किचनच्या कामासाठी त्यानं १२ टक्के दराने लाच मागितली होती. अडीच कोटी रुपयांचं काम मंजूर करण्यासाठी बागुलने पैसे मागितले होते. हेच पैसे घेताना तो पकडला गेला. काल रात्रभर बागुलच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्या इतर मालमत्तांची चौकशी सध्या सुरू आहे.