मुरगूड (प्रतिनिधी ) : गुन्हा व गुन्हेगारांचा माग काढणे, गुन्हेगारांना आयडेंटिफाय करणे, अपप्रवृत्तीला आळा घालणे, घटनेची सत्यता तपासणे या कामी पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यास ६० ते ७० टक्के काम सोपे होते. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परिसर आणि गावागावांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे पसरवण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले आहे.
मुरगुड पोलीस ठाणे अंतर्गत ५७ गावातील गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, मुरगुड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे रंगराव चौगले, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील, आप्पासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. चंद्रकांत जाधव ओमकार पोतदार, राजेश पाटील (मळगे), बाळासाहेब भराडे, नामदेव भराडे (हळदवडे) यांनी मनोगते मांडली.
दुर्दैवाने लोक असंवेदनशील बनत चालले असून इर्षेखोर वृत्तीतून सामाजिक शांतता भंग पावणार नाही, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत विधायक उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षेला पूरक अभ्यास वर्ग, विद्यार्थ्यांना अर्थसाह्य, सीसीटीव्ही आदी सामाजिक उपक्रम राबवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी उत्साहात गणेशोत्सव पार पाडावा असेही आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना केले.
स्वागत सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे यांनी केले. प्रास्ताविकात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवात घ्यावयाच्या विविध परवानग्या, नियम व अटी याविषयी माहिती दिली. यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओमकार पोतदार, तेजस घोरपडे, कृष्णात भुते, अनिल पाटील, रघुनाथ बोडके (कुरणी), प्रा. सुनील डेळेकर, प्राचार्य महादेव कानकेकर यांचा सत्कार करण्यात आला. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे यांनी आभार मानले.