कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामागे एक धक्कादायक कारण आहे. या मुलाने मदरश्याला सुट्टी मिळावी यासाठी त्याने आपल्त मित्राला ठार केलं. या तरुणाने तोंडात बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन आपल्या मित्राची हत्या केली आहे. याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

आळते इथं अंधाराचा फायदा घेवून संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याने 11 वर्षीय फैजान नजिम याच्या तोंडात गोळा कोंबला, त्यानंतर विजेचा शॉक देऊन खून केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खून झालेला 11 वर्षीय फैजान नजिम हा बिहार राज्यातला आहे. कोल्हापूर पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे.

पोलीसांना हा संशयित अल्पवयीन विद्यार्थी घाबरून काहीही सांगत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना आणि मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलाने त्यांच्यासमोर सगळा उलगडा केला. सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी खून केल्याच कबुली त्याने दिली. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.