कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सन्मती सहकारी बॅकेत ठेवीदाराच्या ठेव पावतीवर बोगस कर्ज दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ठेवीदार संगीता सचिन मेथे (रा. अब्दुल लाट) यांनी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शाखाधिकारी सतीश चौगुले , सुकुमार बेडक्याळे यांच्यासह अध्यक्ष सर्व संचालक अशा एकूण २४ जणांविरोधात येथील पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे. सहकार धोरणालाच सहकारातील चालकांनीच केराची टोपली दाखविल्याने खळबळ उडाली असून या प्रकाराने कर्ज देणारे लखपती तर घेणारे भिकपती झाले आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीमध्ये, तक्रारदार पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत २०२० साली यंत्रमाग उद्योगासाठी गावातील सन्मती बॅकेच्या शाखेतून २४ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्ज मिळाल्याने मेथे यांनी त्याच बॅकेत विविध रकमेचे २१ लाख ५० हजारांचे ठेवपावती केली होती. पीएमएस योजनेअंतर्गत कर्ज असल्याने अनुदानाचे कारण सांगून मेथे यांच्याकडून ठेवीच्या पावत्या शाखाधिकारी यांनी ताब्यात घेतले होते. मात्र, कोरोनामुळे उद्योग अडचणीत आल्याने व कर्जावरील व्याज वाढत असल्याने मेथे यांनी २०२२ साली ठेव पावती मोडून ती रक्कम कर्जात समावेश करण्यासाठी बॅकेत गेले असता शाखाधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जावू लागली.

तसेच बँकेच्या अध्यक्षासह संचालकांनीही तक्रारीची दखल घेत नसल्याने मेथे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यामुळे मार्च २०२५ मध्ये ठेवपावतीवर कर्ज असल्याचे सांगून बॅकेने खाते उतारा दिला. ठेव अब्दुल लाट शाखेत असताना तळंदगे शाखेत ठेव पावतीवर कर्ज न काढताच कर्ज दाखविल्याने तक्रारदार चक्रावून गेले अन आपली फसवणूक झाल्याचे ओळखून याची चौकशी होवून न्याय मिळावा यासाठी फसवणूक करणाऱ्या विरोधात येथील पोलिसांत तक्रार दिली आहे.