नाशिक (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (शनिवार) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भरत गावित यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

माणिकराव गावित यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रविवारी नवापूर इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माणिकराव गावित यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ते सलग नऊ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांनी १९६५ साली ग्रा.पं. पासून राजकारणाला सुरुवात केली. ते १९८१ साली पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री पदांची जबाबदारी संभाळली होती. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही राहिले आहेत. माणिकराव गावित यांना दोन मुले असून, ते सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार, तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.