अहमदनगर : अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन एका माजी आमदाराला ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात समोर आला आहे. दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराने ही खंडणी मागितली आहे.

बीड जिल्ह्यातील एका माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

माजी आमदाराने  फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ‘तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडियावर व्हायरल करायची नसेल, तर आम्हाला एक कोटी 25 हजार रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करत दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या तथाकथित पत्रकाराने माजी आमदाराला ब्लॅकमेल करत होते. 

संबंधित महिलांशी तडजोड करून देण्याची ऑफर देत बीड जिल्ह्यातील माजी आमदाराला खंडणी मागण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पैसे दिले नाही तर तुमचे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान,  अहमदनगरमध्ये युट्युब चॅनेलचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून अनधिकृत न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत.