मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे सर्वश्रुत आहे. भाजपने काँग्रेसचा आणखी एक नेता गळाला लावला आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या खास मर्जीतले मानले जाणारे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. ते उद्या (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कृपाशंकर सिंह हे उद्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका समजला जात आहे. कृपाशंकर सिंह यांचा स्वत:चा असा मतदारवर्ग आहे. मुंबईत सुमारे ४५ लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. हा आकडा मतदारांच्या एकूण टक्केवारीपैकी २५ टक्के इतका आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतदार कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशानंतर भाजपच्या पाठीशी राहणार की काँग्रेसलाच साथ देणार, हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळेल.