गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधील परिमंडळ वन अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वनपाल सागर पांडुरंग यादव (वय ४३) यांना ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलूचपत पथकाने अटक केली आहे. त्यांनी अर्जावर कार्यवाही करण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार, तक्रारदार हे झाडांच्या तोडणीसाठी आवश्यक परवानग्या घेऊन टेंडरच्या माध्यमातून व्यवसाय करणारे आहेत. त्यांना आजरा तालुक्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित झाडांच्या लिलावाचे काम त्यांना मिळाले होते. त्यासाठी त्यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी वन परिक्षेत्र कार्यालय आजरा येथे अर्ज सादर केला होता. या अर्जावर पुढील कार्यवाहीच्या चौकशी करण्यासाठी ते २९ एप्रिल रोजी परिमंडळ वन अधिकारी कार्यालय, गडहिंग्लज येथे गेले असता, वनपाल सागर यादव यांनी त्यांच्याकडे ६ हजारांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदाराने तात्काळ अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार २९ एप्रिल रोजीच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता, सागर यादव यांनी तडजोड करत ५ हजाारांवर सहमती दर्शवली. आणि हे प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. वनपाल सागर यादव याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणामुळे वनविभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहा. फौजदार अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे आणि प्रशांत दावणे यांनी केली.