कळे प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणजे पंढरीची आषाढ वारी ! 17 जुलै रोजीच्या आषाढी एकादशीसाठी देहू व आळंदी येथील मुख्य पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या 28 व 29 जून रोजी होत आहे. त्यामुळे यामध्ये सामील होणाऱ्या मुक्कांमी दिंड्यांचे प्रस्थान ग्रामीण भागातून होत आहे. सुमारे 4 ते 5 गावाच्या वारकरी भक्तांची मिळून एक दिंडी निघते. ही संख्या अगदी 50 ते 500 वारकरी विठ्ठल भक्तांपर्यत असते. या नियोजनासाठी दिंडी चालक व त्यांचे सहकारी परिश्रम घेतात.भेटी लागे जिवा। लागलीसे आस॥ या भावनेने वारकरी पंढरीच्या ओढीने आळंदी व देहूहून पंढरपूरला जात असतात.

सावर्डे-मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथील प्रथमच 50 वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळयाचा प्रारंभ केला आहे. आतापर्यत हे वारकरी विभागातील अनेक दिंड्यातून जात होते. पण या वर्षीपासून गावातूनच दिंडी काढावी ही भावना वारकऱ्यांतून व्यक्त होत होती. दिंडी चालक ह.भ.प.आबा पाटील सेवक सरदार पाटील, बळवंत मोरे, शिवाजी मोरे, हरी मोरे, आनंदा पाटील, छाया पाटील, शांताबाई गुरव, ईश्वर लोकरे महाराज यांनी पुढाकार घेऊन नियोजन केले.

बुधवार दि.26 रोजी.सकाळी शेकडो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याचे गावातून प्रस्थान झाले.आरती, भजन, टाळ-मृदूंगाच्या गजरात व माऊली-ज्ञानदेव-तुकाराम च्या जयघोषात दिंडी मार्गस्थ झाली. गावाच्या वेशी पर्यत ग्रामस्थ दिंडी सोहळयात सहभागी झाले होते. हा सुखसोहळा स्वर्गी नाही याचा प्रत्यय सर्व भाविक व ग्रामस्थांना येत होता.