गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून गारगोटीसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. पण गारगोटी येथील दुकानांची शटर्स ओपन होतील या आशेवर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकाना पुन्हा आता पाच दिवस कडक लॉकडाउनला सामोरे जावे लागणार आहे. बुधवार (दि.१४) ते रविवार (दि.१८) जुलैपर्यंत गारगोटी परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये आता तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गारगोटी शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनचा निर्णय व्यापारी असोसिएशन आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार दुकाने बंद राहणार आहेत. तर दूध विक्री केंद्र सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चालू राहतील. कृषीसेवा केंद्र सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत चालू राहणार आहे. या व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय किंवा दुकान चालू केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.