कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारभोगाव राज्य मार्गावरील पुनाळफाटा ते कुंभारवाडा या रस्त्यावरील सांडपाणी सिमेंटच्या पाईपद्वारे ओढ्याला काढण्याच्या कामाला  सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग,  ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार  घेतल्याने हे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुनाळफाटा ते कुंभारवाडा या रस्त्यावर गटारीतील सांडपाणी येवून ग्रामस्थ व वाहनधारकांना नाहक त्रास होत होता. या रस्त्याची हद्द बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली येत असल्याने याठिकाणी काम करायला ग्रामपंचायतीला मर्यादा येत होत्या. याकडे लक्ष वेधण्यासाठी व सांडपाण्याचा निचरा करण्याच्या मागणीसाठी ७ डिसेंबर २०२१ रोजी सरपंच सुभाष पाटील व स्थानिक नागरिकांनी सांडपाण्यात ठिय्या मारून निदर्शने व आंदोलन केले होते.

त्यानंतरही काम वेळेत सुरू न झाल्याने २० डिसेंबररोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सा.बां. विभागाला पुन्हा निवेदन देऊन पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली होती. दरम्यान बुधवारी (दि. २२) ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या परिसरातील गटारींची जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता केली. गुरुवारी सकाळी सा.बां.विभागाच्या उपअभियंता सरिता देशपांडे,  शाखा अभियंता लोहार,  ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातून येणारे सांडपाणी पुनाळफाटा येथून पूर्व दिशेला असणाऱ्या ओढ्यात काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चर मारून सिमेंटच्या पाईप टाकण्यात आल्या.

कळे गावातून येणारे सांडपाणी पुनाळफाटा येथून सिमेंटच्या पाईपमधून ओढ्याला सोडल्याने मुख्य रस्त्यावरून कुंभारवाड्याकडे येणारे सांडपाणी विभागले जाईल. वारंवार रस्त्यावर येणारे सांडपाणी थांबणार आहे. आम्ही ग्रामपंचायतीच्या खर्चाने जेसीबी देवून काम सुरू केले आहे.  

सुभाष पाटील (सरपंच कळे – खेरीवडे)