हैदराबाद : काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हे मंगळवारी तेलंगणात ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान जखमी झाले. राऊत यांच्या चेहऱ्याला मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार मिनार ओलांडल्यावर मी स्टेजकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला, तेव्हा झालेल्या गर्दीमध्ये पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि मी एका बॅरिकेटजवळ पडलो. माझ्या डोळ्याला इजा झाली, रक्तस्त्राव होऊ लागला आणि मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी धक्काबुक्की केली, याचे खापर आता महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील १७ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. यामध्ये राऊत यांचाही समावेश होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा नव्हती.

एखाद्या नेत्याला एका राज्यात सुरक्षा असेल, तर दुसऱ्या राज्यात ही सुरक्षा मिळते. राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा दिली गेली नाही. त्यामुळे राऊत हे व्हीआयपी असल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सामान्य माणूस समजून दिलेल्या धक्क्याने राऊत खाली पडले आणि जखमी झाले.

कदाचित त्यांच्या फोवती सुरक्षा असती तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे राऊत हे जखमी होण्यासाठी एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काही काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. राऊत हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी होती. गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने राऊत यांना जोरात ढकलले.