कोल्हापूर (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊन किमान ७५ झाडांची लागवड करावी आणि लावलेल्या झाडांना किंवा वनांना त्या-त्या भागातील स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्यावीत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (मंगळवारी) दिल्या.

राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एम. बी. चंदनशिवे, अशासकीय सदस्य उदय गायकवाड, अनिल चौगले यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात हरित सेनेच्या २५० शाळा असून, १७० शाळांनी १० हजार ८८९ रोपांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करून हा उपक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

‘देवराई’ उपक्रम करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ४ हेक्टर गायरान उपलब्ध करून द्यावे. यासाठी ग्रामसेवकांनी आपल्या गावातील गायरान जमिनीची निश्चिती करून त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्येही वृक्ष लागवड करण्यात येणार असून, ही लागवड वसाहतीमधील रिकाम्या जागा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात यावी, रोपांच्या उपलब्धतेबाबत सामाजिक वनीकरण विभागाने नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवडीसाठी सामजिक वनीकरण विभागाकडे रोपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विभागीय वन अधिकारी चंदनशिवे यांनी सांगितले. शाळा व शासकीय कार्यालयांनी रोपांची मागणी केल्यास त्यांना रोपे मोफत उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.