नागपूर (प्रतिनिधी) : राज्यातील तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात, हे गणित चुकीचं असल्याचे नागपूर आणि अकोल्याच्या विजयाने स्पष्ट केले आहे, असे म्हणत  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

विधान परिषद निवडणुकीत नागपूरमधून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे , तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल यांनी  विजय मिळवला आहे. या  विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस  यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, हे गणित चुकीचे आहे. राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी आहे. आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे.

आज मला अतिशय आनंद आहे की, माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. विधान परिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजप निवडून आली आहे, असेही ते म्हणाले.