कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व अभ्यागतांसाठी विसावा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पालिकेच्या कक्ष स्थापनेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. खास करून नागरिकांची नोंद ही या ठिकाणी होणार आहे. संबंधित विभागातील कामाबाबत मार्गदर्शनही त्याठिकाणी मिळणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या आणि महापुराच्या काळात नागरिकांना सहजरीत्या मदत व्हावी, यादृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या अत्त्यावशक सेवा कक्षाची मोठी मदत लाभली होती. त्यामुळे असे उपक्रम पालिका राबवत असल्याने शहराचे एक वेगळे आयकॉन निर्माण करण्याचे काम प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव नेहमी करत असतात.

कुरुंदवाड शहर हे २४ हजार लोक वस्तीचे शहर आहे. नागरिकांना पाणीपट्टी, घरपट्टी आणि आपल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी पालिकेत यावे लागते. काहींना आपल्या परिसरातील व्यथा मांडण्यासाठी मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे यावे लागते. दररोज शेकडो नागरिकांची रेलचेल सुरू असते. यामध्ये वृद्धांची संख्या जास्त, तर दिव्यांग बांधवही येत असतात. त्यांचे काम होईपर्यंत विसावा घेण्यासाठी कक्षाची स्थापना करून प्रशासक जाधव यांनी नागरिकांप्रती केलेल्या या लोकाभिमुख कामामुळे नागरिकांमध्ये नगरपरिषदेप्रती सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.