टोप प्रतिनिधी (मिलिंद कुशिरे): जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हाभर निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भादोले मतदारसंघात यंदा अनुसूचित जाती (महिला) आरक्षण जाहीर झाले असून, या पार्श्वभूमीवर “उपरा उमेदवार की स्थानिक..?” या चर्चेला सध्या चांगलाच ऊत आला आहे.
आरक्षण घोषित झाल्यापासूनच मतदारसंघाबाहेरील अनेक मातब्बर नेते गावोगावी भेटी देत आहेत. संभाव्य उमेदवारांच्या दृष्टीने या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर स्थानिक नेत्यांमध्ये मात्र “आपल्याच भागातील उमेदवाराला संधी मिळावी” अशी भावना स्थानिक नेते तसेच ग्रामस्थांतून तीव्र झाली आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये बैठका, चर्चासत्रे सुरू असून नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भादोले मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.