मुंबई (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस यांनी आपण स्वत: मंत्रिमंडळाबाहेर राहणार असल्याचे जाहीर केले. शिंदे यांना मुख्यमंत्री करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देत फडणवीस यांनी जणू मास्टरस्ट्रोकच लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला ५६ जागा, तर भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म ज्यांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.

फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला मत दिले नव्हते. भाजप युतीला दिले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. आमच्याच मतदारसंघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल, तर कशाच्या जोरावर लढायचा हा प्रश्न शिवसेना आमदारांसमोर होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती तोडा, असा निर्णय आमदारांनी घेतला. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राधान्य दिले.

उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्यासोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे. आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. ही तत्त्वाची आणि हिंदुत्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांना समर्थन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘भाजपाकडे १२० चे संख्याबळ आहे. असे असताना मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते; मात्र, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी यांचे आभार मानतो. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कुणाला काही मंत्रीपद पाहिजे असे काही नव्हते. जे घडले ते तुमच्यासमोर होते.