ठाणे (प्रतिनिधी) : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर  सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज (मंगळवार) सकाळी साडे आठ वाजता छापा टाकला. त्यांच्या घराची आणि कार्यालयाची  शोधमोहिम सुरु केली आहे. तसेच सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीने छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक सध्या परदेशी केल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर शिवसेनेच्या इतर नेत्यांना ही ईडीने नोटिसा पाठवल्याचे समजते.

टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु केली आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ईडीने मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु केल्याचे सूत्रांनी  सांगितले. दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सूडभावनेने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर भ्रष्टाचार झाला असेल, तर कारवाई झालीच पाहिजे, असे  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.