मुंबई (प्रतिनिधी) : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना यांना झटका दिला आहे. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  खडसे यांना उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आता खडसे यांनी सीडी लावूनच दाखवावी’, असा चिमटा काढला आहे.

भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे यांनी ‘जर त्यांनी माझ्यामागे इडी लावली तर मी सीडी लावेन, असा भाजपला इशारा दिला होता. काल चौधरी यांना इडीने अटक केली तर आज खडसे यांना समन्स बजावले. यावरून राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या घोटाळ्याची चौकशी आताच्या सत्ताधाऱ्यांनीच सुरु केली होती. त्यामुळे ईडी आता याप्रकरणाचा तपास करत आहे. मुळात ‘कर नाही त्याला डर कशाला’? आता कुणाला काय सीडी लावायचेय ती त्यांनी लावावी, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.