मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दहा किलो खाद्य तेल देण्याचे ठरविले आहे. एकूण दीड हजार पर्यंत सभासद असलेल्या या पतसंस्थेच्या मुरगूड सह गारगोटी,बिद्री, केनवडे याठिकाणी शाखा आहेत. कागल तालुक्यातील ही एक अग्रेसर पतसंस्था असून स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेतून निर्माण झाली आहे.

सव्वाशे कोटींच्या वर ठेवी असलेल्या या पतसंस्थेने या वर्षी दीड कोटीच्या आसपास निव्वळ नफा मिळविला आहे.याचे सर्व श्रेय संचालक मंडळाने संस्थेच्या सभासदांना दिले आहे. म्हणून यंदाची त्यांची दिवाळी अत्यंत आनंदाची व उत्साहाची जावी म्हणून खाद्यतेल भेट वस्तू म्हणून देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. सध्या प्रातिनिधिक स्वरूपात कांहीं सभासदांना भेट वस्तू देऊन सुरुवात केली असली तरी संस्थेचा परिसरातील सभासद विस्तार पाहता भेटवस्तूंचे वाटप ३१ डिसेंबर पर्यंत चालू राहील असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

यावेळी सोमनाथ यरनाळकर, चेअरमन राजाराम कुडवे, व्हा. चेअरमन, उदयकुमार शहा, संचालक एकनाथ पोतदार, आनंदा देवळे, मारूती पाटील, सुखदेव येरुडकर, प्रकाश हावळ, आनंद जालिमसर, दत्तालय कांबळे, रूपाली शहा, संचालिका रेखा खाशाबा भोसले, राहूल शिंदे, कार्यकारी संचालक चिदंबरम एकल, शाखाधिकारी मुरगूड बिद्री केनवडे गारगोटी सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थितीत होते.