कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी पॅनेल बांधणीसाठी हालचाली गतिमान झाल्या असताना शिवसेनेला पाच जागा देण्यात याव्यात, अशी सूचना थेट मातोश्रीवरून आली आहे. आज दुपारी याबाबत शिवसेना खा. संजय मंडलिक यांना फोन आला असून त्यांच्याकडे नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

विद्यमान २ जागा कायम ठेवून आणखी इतर गटातील ३ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवण्याची सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रस्तावानंतर आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रक्रिया गटातून विद्यमान संचालक संजय मंडलिक, महिला गटातून निवेदिता माने, गंधालीदेवी कुपेकर किंवा ओबीसीमधून संग्राम कुपेकर, आणि माजी आमदार चंद्रदीप नरके गटासाठी १ जागा अशा पाच जागांची यादी पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेनेची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सूचक विधान शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केले होते. आता शिवसेनेला ५ जागा देण्यास महाविकास आघाडी तयार होणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.