कोल्हापूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविक-वारकऱ्यांच्या वाहनांना पथ करातून (टोल) सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथून टोल फ्री पास देण्यास सुरवात झाली आहे.

ही सुविधा १५ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली. हलक्या आणि जड वाहनातून जाणाऱ्या, पालखीसोबत असणाऱ्या वाहनधारकांनी हे सवलतीचे पास घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले. वारकऱ्यांच्या वाहनांना पथ करातून सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ६ जुलैला घेतला होता. टोल माफ केल्याने वारकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.