कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात राजरोसपणे सुरु असलेला मटका, व्हिडीओ गेम यासह इतर अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा व्यवसाय ताबडतोब बंद करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील जुना राजवाडा, करवीर, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस ठाण्यातील निरीक्षकांना, तसेच शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या, करवीर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. जर दोन-चार दिवसांत हे व्यवसाय बंद झाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे खड्डे खणून त्यात आम्ही स्वत:ला चार-पाच फूट गाडून घेऊन जोपर्यंत मटका व्यवसायातील विजय पाटील (राजवाडा), आयुब जमादार (शाहूपुरी) आणि करवीर हद्दीतील मोठी धेंडे यांच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत खड्डयातून आम्ही बाहेर पडणार नाही. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर हे आंदोलन अगदी शंभर टक्के करणार असून, अवैध व्यवसायाच्या जाळ्यातून सामान्य गोरगरिबांची सुटका केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही धाक धपटशाहीला आम्ही भिक घालणार नाही, असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू जाधव यांनी दिला आहे.