सोलापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री व माजी खासदार निवेदिता माने यांनी एकाची १  कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण २०१९ सालचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मागच्या तीन वर्षांपूर्वीच्या फसवणूक प्रकरणात माजी खासदार निवेदिता माने पुन्हा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, तक्रारदाराने माजी खासदार माने यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.

माजी खासदार निवेदिता माने व इतरांनी संगनमत करून २००९ मध्ये उजनी जलाशयातील गाळ व रेती उचलण्याच्या ठेक्याची स्थगिती उठवली होती. त्यावेळी तो ठेका पुढील १५ वर्षे राहावा म्हणून १ कोटी ५५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे केचे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत केचे यांनी माजी खासदार माने यांच्याकडे अनेकदा पैसे मागितले. त्यासाठी ते कोल्हापूरलाही गेले; मात्र त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले गेले नाही. माने यांनी फसवणूक केलेली रक्कम व्याजासकट द्यावी, यासाठी मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मागच्या चार वर्षांपूर्वी निवेदिता माने व इतर पाच आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तीन वर्षे झाली; मात्र पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही. पोलिसांच्या या उदासीनतेवर फिर्यादी बबन केचे यांनी बोट ठेवले. याचवेळी त्यांनी पोलिसांच्या सुस्त कारभाराच्या निषेधार्थ टेभुर्णी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करुन उपोषण केले.

मी तीन वर्षांपूर्वी तक्रार दाखल करूनही पोलीस पुढील कारवाईला दिरंगाई का करताहेत? अटकेची कारवाई आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यास चालढकल का केली जात आहे? तक्रार धूळखात का पडलेय? असे सवाल फिर्यादी बबन केचे यांनी उपस्थित केले.