गडहिंग्लज  (प्रतिनिधी) : ‘जब कोई आदमी बाहर मर रहा हो, तो उसको ईलाज के लिये फॉर्म भरणा जरुरी है क्या.?’ एका हिंदी चित्रपटातल्या या प्रश्नाची दाहकता ‘गडहिंग्लज’ मधील एका नामांकित रुग्णालयाच्या दारात एका गर्भवती महिलेने तिच्या कुटुंबियांसह अनुभवली. ‘कोव्हीड टेस्ट’ केली नसल्याने तिला प्रसूतीच्या मरणकळा सोसत रुग्णालयाबाहेर वाहनात बसूनच बाळाला जन्म द्यावा लागला. त्यानंतर तिच्यासह तिच्या बाळाला महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तिथून गडहिंग्लजमधील खासगी रुग्णालयात उपचार मिळाल्याने सुदैवाने दोघंही सुखरूप आहेत. पण, कोव्हीड टेस्टची सक्ती जीवघेणी ठरली असती तर..?

वाघरळी (ता. गडहिंग्लज) येथील एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने काल (सोमवार) रात्री माजी सरपंच मारुती कोकितकर यांनी त्यांच्या खासगी वाहनातून सामनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. पण तेथील महिला डॉक्टरने आधी कोव्हीड टेस्ट करून येण्याचा सल्ला दिला. कोकितकर यांच्या कोणत्याही विनंतीला त्यांनी दाद दिली नाही. दरम्यान असह्य कळा सोसत त्या गर्भवतीने गाडीतचं एका मुलीला जन्म दिला. तरीही ‘त्या’ रुग्णालयातील महिला डॉक्टरला त्यांची दया आली नाही. त्यामुळे कोकितकर यांनी तशीच महागाव येथील आरोग्य केंद्राकडे गाडी वळविली. तिथं त्या बाळाची नाळ कापून प्राथमिक उपचार केले पण बाळाला बालरोगतज्ज्ञ डॉक्टरची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

रात्री 2 वाजता कोकितकर पुन्हा त्यांना घेऊन गडहिंग्लजला आले. त्यावेळी त्यांनी गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांना विनंती केली. कोरी यांनी उपस्थित राहून डॉ. माने हॉस्पिटलमध्ये सदर महिलेला तर डॉ. सुतार हॉस्पिटलमध्ये तिच्या बाळाला ऍडमिट केले. त्या दोघा डॉक्टरनी रात्री माणूसकी जोपासल्यामुळे त्या दोघी सुरक्षित आहेत. पण, ‘त्या’ रुग्णालयाच्या कागदी घोड्यांपुढे हतबल महिलेच्या अथवा तिच्या बाळाच्या जीवितास धोका निर्माण झाला असता तर..?

प्रशासनाच्या नियोजनाला ‘निष्काळजीपणा’चा हरताळ

‘कोव्हीड’च्या पार्श्वभूमीवर येथील गटविकास अधिकारी शरद मगर यांनी गर्भवती महिलांबाबत काटेकोर नियोजन केलं आहे. पूर्ण तालुक्यातील गर्भवती महिलांची परिपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या संभाव्य प्रसुती तारखे आधी कोव्हीड टेस्ट करण्यात येते. तालुक्यातील रुग्णालयांमध्ये खास गर्भवती महिलांच्या अत्यावश्यक सेवेसाठी ‘अँटिजेंन टेस्ट’ किट राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मग ‘त्या’ हॉस्पिटलमध्येचं तिची टेस्ट का होऊ शकली नाही..? त्या महिलेनेही संभाव्य तारखेबाबत का निष्काळजीपणा दाखवला..? असे अनेक प्रश्न जरी उपस्थित होत असले तरी ‘अशी’ वेळ पुन्हा कुणावर येऊ नये याची दक्षता घेतली जाणार का..? हा खरा प्रश्न आहे.