कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.

डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. तसेच या समारंभात माजी राज्यपाल पदमश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून सौ. शांतदेवी पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर यावेळी जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीतही दाखवण्यात आली.

यावेळी डॉ. डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून आपापल्या विभागात प्रथम क्रमांकाचे प्राविण्य मिळविले आहे त्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या योजनेत प्रथम वर्षी ६६ विद्यार्थ्यांना तर यावर्षी १३६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण वर्षाची फी माफ केली जात असल्याचे सांगितले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व असते. आमच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा आहे. आई वडिलांचे संस्कार आणि त्यांनी केलेले कष्ट न विसरता विद्यार्थ्यांनी आयुष्यात कार्यरत राहून इतर विद्यार्थ्यांना मदत करावी. तसेच येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने किमान एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला चांगले शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

तळसंदे येथील डी. वाय.पाटील एज्युकेशनल सिटी येथील शांताई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील, सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्कॉलरशिप स्कीमचे अध्यक्ष आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त वैजयंती पाटील, तेजस पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील, मेघराज काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, अजित बेनाडीकर, देवराज पाटील,कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलगुरू राकेश कुमार मुदगल, कुलगुरू के प्रथापन आदी उपस्थित होते.