कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केलेल्या संशोधनामुळे महाविद्यालयाला 22 पेटंट प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाकडून होणाऱ्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले. यावेळी डॉ. संजय पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते या पेटंटधारकांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. संजय पाटील म्हणाले की, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थी आणि प्राध्यापकाना संशोधनासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबरच आंतरशाखीय संशोधनाला चालना देणारे असण्याची काळजी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व संशोधन विभाग नेहमी घेतो. भविष्यामध्येही महाविद्यालय जनरलमधील प्रकाशन,पेटंट समाजाला उपयोगी प्रकल्प, कन्सल्टन्सी या रूपाने संशोधन क्षेत्रामध्ये घोडदौड अबाधित राखेल. या संशोधानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. तसेच ते व्यावसायिक रुपात पुढे येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, उत्तम अभियंते, उत्तम नागरिक घडवताना कुशल संशोधक घडावेत यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. प्रात्यक्षिक व औद्योगिक ज्ञान देतानाच त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा यावर आमचा विशेष भर असतो. विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाला पेटंटचे कोंदण मिळल्याने अतिशय समाधान वाटत असल्याचे सांगितले.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव, डॉ. संतोष चेडे, डॉ अमरसिंह जाधव, डॉ. सुनील रायकर, डॉ. मनीषा भानुसे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. विनायक पुजारी आदी उपस्थित होते.