कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या “सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च” विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवण्यासाठी संशोधित केलेल्या “हायड्रोथर्मल” या रासायनिक पद्धतीसाठी पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. उमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.

ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मँगनीज फॉस्फेट आधारित पातळ फिती (थिन फिल्म्स) तयार करण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक “हायड्रोथर्मल” या रासायनिक पद्धतीसाठी हे पेटंट जाहीर झाले आहे. पातळ फितीमुळे पदार्थाची स्थिरता, ऊर्जा साठवण क्षमता, सुपरकॅपॅसिटरची लवचिकता वाढवण्यासाठी मदत होते. येणाऱ्या काळात अशाप्रकारच्या पातळ फितीचा वापर करून ऊर्जा साठवणूक करणारी उपकरणे तयार केली जातील,अशी माहिती मुख्य संशोधक प्रा.डॉ.सी.डी.लोखंडे यांनी दिली.

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा.डॉ.सी.डी. लोखंडे आणि डॉ. उमाकांत पाटील यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी कुलदीप गुंडूराव बेलेकर, रणजीत पांडूरंग निकम आणि सुमिता सूर्यकांत पाटील यांचा सहभाग होता. सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.आर.के.शर्मा आणि कुलसचिव डॉ.व्ही.व्ही.भोसले यांनी अभिनंदन केले.