शिरोळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस,  खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावा या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (मंगळवार) शिरोळ येथे सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी शिरोळ तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्यावतीने तहसिलदार अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूही महागल्या आहेत. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करून लोकांना दिलासा द्यायला हवा होता,

याच्या निषेधार्थ काँग्रेसने महागाई विरुद्धचा लढा चालू केला आहे.  भाजपाने आपल्या जाहिरनाम्यामध्ये २०१४ ला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये भाववाढ करणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु पेट्रोल, डिझेलचे दर आता शंभरी पार झाले आहेत. याचा जाब भाजप सरकारला विचारण्यासाठी ही सायकल यात्रा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे सरचिटणीस अशोक कोळेकर, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, रणजीत पाटील, श्रीकांत लंबे, अमोल चौगुले, शिरोळ तालुका महिला कॉंग्रेस कमिटी अध्यक्षा, मिनाज जमादार, उपाध्यक्षा अश्विनी चौगुले, पं. स. सदस्या अर्चना चौगुले यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी होत्या.