मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत 

रिपाई नेते दीपक चंदनशिवे यांच्या आंदोलनाला यश …

पंढरपूर (प्रतिनिधी)

तत्कालीन पुनर्वसन अधिकारी ,उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचा सोलापूरमधील पुनर्वसन विभागातील कारभार चव्हाट्यावर आला असून, त्यांनी वाटप केलेल्या दुबार जमिनी, पुन्हा सरकारजमा करण्यात आल्या आहेत. याबाबत खात्यांतर्गत चौकशी सुरू असून, दोन महिन्याच्या आत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुनर्वसन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे. यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

काय होते आरोप

तत्कालीन पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी चळे येथील ५९२/१, ५९८/१ या जमिनी खोटी कागदपत्रे बनवून सखाराम कदम आणि वाडेकर यांच्या नावे केल्या. या जमिनी बोगस कागदपत्रे तयार करून नितीन बाबर यांच्या नावे खरेदी केल्या. याच जमिनीत कालवा दाखवून, सुमारे 54 लाख रुपयांचा धनादेश क्र. 21423 नितीन बाबर यांच्या नावे, आयडीबीआय बँक पंढरपूर येथे काढण्यात आला होता. सदर जमिनीचे वाटप बोगस असल्याने , जमीन सरकार जमा करण्यात आली असली तरी, हडपलेली रक्कम मात्र जमा करण्यात आली नाही. याच प्रकारे कोयना धरणाची जमीन मोजणी धरणग्रस्ताला खोटी कागदपत्रे तयार करून, गांधी जयंती दिवशी हडप करण्यात आली असल्याबाबतची तक्रार, दीपक चंदनशिवे यांच्याकडून करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी याबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली होती. हिवाळी अधिवेशनाच्या प्रथम सत्रात आ. राम शिंदे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. शेकापचे आ. जयंत पाटील, आ. भाई जगताप, आ.शशिकांत शिंदे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही हा विषय उचलून धरला होता.

राज्याचे पुनर्वसन मंत्री संदिपान भुमरे यांनी उत्तर देताना सांगितले की, पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दुबार जमिनीचे वाटप केले होते. सदर प्रकरणातील अधिकाऱ्यांनी दुबार जमिनीचे वाटप केल्याचे सिद्ध झाले आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकरणाची खात्यातर्गत चौकशी सुरू असून, दोन महिन्याच्या आत या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी, सोलापूर जिल्ह्यात धरणग्रस्तांना दुबार जमिनीचे वाटप केले होते. दलालांना हाताशी धरून पुनर्वसन जमिनींचे मोठे व्यवहार केले जात असल्याचा आरोप, रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांनी केला होता. ही मागणी लावून धरत असताना पंढरपूर , पुणे आणि मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनेही केली होती. यानंतर हा मुद्दा थेट हिवाळी अधिवेशनात पोहोचला आहे. तत्कालीन पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण या आता सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर येथे त्यांनी केलेला कारभार गोत्यात आला असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली आहे.