कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील युनायटेड स्पोर्ट्स क्लब पुणे व सांगली क्रिकेट असोसिएशन या संघा दरम्यान झालेला दुसरा सामना पुण्याच्या युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने जिंकला.

युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना ७२.१ षटकात सर्वबाद १८२ धावा केल्या. उत्तरादाखल सांगली जिल्हा संघाने ६८.३ षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. त्यामुळे पुणे स्पोर्ट्स क्लबने हा सामना १९ धावांनी जिंकला.

सांगली संघाकडून जीवन घोटणकर याने ६२ धावा केल्या. शिवाय डावात ४ बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. पुणे संघाकडून सर्वाधिक ३३ धावा अर्पण धार याने केल्या. पुणे संघाकडून प्रेम निंबाळकर व श्लोक कापसे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या सामन्यात पंच म्हणून अक्षय पवार आणि महेश माने यांनी काम पाहिले.

या स्पर्धेतील तिसरा क्रिकेट सामना १८ व १९ डिसेंबरला पुणे स्पोर्ट्स क्लब आणि सिंधुदुर्ग जिल्हा या संघांमध्ये होणार आहे. सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे सहकार्य लाभले.