सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा सुटता सुटेना झाला आहे. कॉंग्रेस सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहे. तर एकीकडे आज संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नसून आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला तयार आहोत. पण वेळ पडली तर कोणत्याही लढाईसाठी तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा कदम यांनी याआधी घेतला आहे. तसेच विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेससकडे राहावी, अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. पण शिवसेना ठाकरे गट सांगलीची जागा लढण्यावर ठाम असून सांगली लोकसभा जिंकण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. तर संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर असताना सांगलीतील कॉंग्रेस नेते हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता तरी सांगलीचा वाद दिल्ली दरबारी मिटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

दरम्यान, विश्वजित कदम यांनी दिल्लीला रवाना होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील काही कॉंग्रेस नेते दिल्लीला जाऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून मी माझी भूमिका ठामपणे मांडत आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेविषयी जो काही निर्णय आहे तो आम्हाला सांगावा, असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना कदम म्हणाले, सांगलीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अंतर्गत बैठक आहे. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. बाकी पक्षाकडून तशा आम्हाला अधुकृत सूचना कॉंग्रेस नेतृत्वाकडून मिळालेल्या नाहीत.