टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर परपेक्ट पिन कंपनी समोर आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एका अज्ञात कंटेनरने मोटरसायकला धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटरसायकलने पेट घेतल्यामुळे मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी शिरोली पोलिसांनी धाव घेवून मोटरसायकलची आग विझवली. मात्र, कंटेनर चालकाने गाडीसह पलायन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक (एमएच ०९ ए फ ६४५८) ला मागून येणाऱ्या एका अज्ञात कंटेनरने धडक दिली. त्यामुळे मोटरसायकल कंटेनरसोबत १५ ते २० फुट फरफटत गेल्याने मोटरसायकलवरील अशोक गणपती पाटील (वय ५०), शारदा पाटील (वय ४० दोघेही रा. केखले ता. पन्हाळा) हे गंभीर झाले. हे दोघे कामानिमित्त कोल्हापूर येथे जात असताना हा अपघात झाला त्यांच्या मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले. मोटरसायकल कंटेनरच्या चाकात सापडल्याने पेट्रोल टाकी फुटून टाकीतील पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने मोटरसायकलने पेट घेतला.

यावेळी मोटरसायकलने पेट घेतल्याचे पाहून स्फोट होईल या भितीने नागरिक पुढे येण्यास धजत नव्हते. अखेर पोलिसांनी वेळेत येवून मोटरसायकलची आग विझवली. मात्र, कंटेनर चालकाने गाडीसह पलायन केले असून जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.