कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची सन २०२१-२२ या सालाकरीता देय असणारी घरफाळा बील महानगरपालिकेकडून तयार करण्यात आली आहेत. सर्वांची बिले महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या मंजूर केलेल्या धोरणानुसार दिनांक ३० जून अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये ६ टक्के सवलत प्रचलित धोरणानुसार देण्यात आली आहे.

सध्या महानगरपालिकेची वसूली कमी असल्याने आर्थिक उपलब्धतेमुळे महापालिकेस अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चालू आर्थिक वर्षाची देयके तात्काळ तयार करून महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे घरफाळा विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी युध्द पातळीवर काम करून सर्व मिळकतीचे देयके तयार करून संकेत स्थळावर प्रसिध्द केली आहेत.

तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी  http://kolhapurcorporation.gov.in:8080/ kmcop/Mi/CitizenLogin.aspx या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अथवा महानगरपालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत आपल्या कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. ऑनलाईन भरणा करताना कांही अडचणी असलेस महापालिकेच्या डेटा सेंटर (फोन नंबर 0231-2540988) या नंबरवर संपर्क साधावा त्याचप्रमाणे या अनुषंगाने कांही तक्रार अथवा माहिती आवश्यक असल्यास संबंधीत वॉर्ड ऑफिसमध्ये अथवा  propertytax@kolhapurcorporation.gov.in या  e-mail वर आपल्या  Whatsapp नंबरसह तक्रार नोंद करावी. असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.