साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील कातळी येथील लखमापूर येथे अनुसूचित जाती-जमातीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदकडून आलेला बोअर दुसऱ्या ठिकाणी मारला होता. यावेळी कातळी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सदस्यांनी नियोजित केलेल्या जागेवर पुन्हा बोअर मारण्यास भाग पडले. त्यामुळे कातळी गावच्या सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होऊ लागली.

कातळी याठिकाणी दलित वस्तीसाठी बोअर मंजूर होती. ती मारण्यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी सकाळी सहा वाजता आले. यावेळी ग्रामपंचायत मधील एका सदस्याने नियोजित जागा सोडून सरपंच, ग्रामसेवक यांना काही न कळवता ती नियोजित जागेपासून दोन किलोमीटर अंतरावर धनगर समाजाचा बिरू पावना यांच्या घराजवळ मारण्यात आली. याबाबतची माहिती सरपंच, ग्रामसेवक ए. के. तटकरे यांना कळताच ज्या समाजासाठी ही बोर मंजूर आहे त्याच समाजासाठी ही बोअर मारली पाहिजे अशी भूमिका घेत त्या सदस्याची त्याला चूक दाखवून दिली.

तसेच त्या एका सदस्याला सरपंच, ग्रामसेवकांनी धारेवर धरले. अनुसूचित जाती-जमातीसाठी आलेली बोअर ग्रा.प. ला कल्पना न देता दुसऱ्या जागेवर बोअर मारलीच कशी ? याबाबतचा खुलासा मागितला. तसेच तात्काळ नियोजित जागेवर बोअर मारून घेतली. त्यामुळे ग्रामसेवक ए. के. तटकरे, सरपंच उज्वला पाटील, उत्तम पाटील, कमल कांबळे, सुनिता लांबोर, चंद्रकांत कांबळे, अशोक कांबळे यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.