इस्लामपूर (प्रतिनिधी) : सायकलवरून घरी येत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा रासायनिक खतांची पोती भरून निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निरंजन सचिन पाटील (वय ९, रा. जाधव गल्ली, इस्लामपूर) असे मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उरुण परिसरातील खेड रस्त्यावर निरंजन हा सायकलवरून घरी येत होता. त्यावेळी ट्रक क्र. एमएच ५० एन ४६५९ हा रासायनिक खतांची पोती भरून खेडकडे जात होता. दरम्यान, खेड रस्त्यावरील तिकाटण्यावर निरंजन आला असताना तो ट्रकच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडला. यामध्ये ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी निरंजनची ओळख पटत नव्हती. शेवटी त्याच्या कपडे आणि सायकलवरून त्याची ओळख पटली.

घरापासून हाकेच्या अंतरावर मुलगा गतप्राण झाल्याचे समजताच कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. ट्रक ताब्यात घेऊन अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.