मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नागपुरात येऊन घोटाळा उघड करु, असा इशाराच खा. संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांवरचे घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातली कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

भूखंड घोटाळ्याच्या या सर्व प्रकारावर अण्णा हजारे गप्प का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. शिंदेंच्या घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस सारवासारव करत आहेत. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक असल्याची टीकाही राऊत यांनी केली. ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी एसआयटी स्थापन करण्यावरुन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ४० आमदारांना ५०  खोके देऊन फोडण्यात आले, त्या व्यवहारावर एसआयटी स्थापन करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

शिंदे सरकारकडून सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग होत आहे, असा आरोप केला आहे. बदनामी करण्याचे शस्त्र वापरुन खच्चीकरणाचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप राऊत यांनी केला. आम्ही सगळ्या तपासांना सामोरव जाऊ पण तुम्ही तोंडावर पडाल, असा इशारा राऊतांनी सरकारला दिला आहे. नाईट लाईफला विरोध करणारे आशीष शेलार कुठे आहेत, असा सवालही राऊतांनी विचारलाय. हे दुतोंडी नाग असून, दोन्ही बाजूंनी वळवळतात या शब्दांत राऊतांनी शेलारांवर हल्ला चढवला.