नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एक कोटीहून अधिक केंद्रिय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आज चांगली बातमी मिळू शकते. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मंजूर केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर डीएची फाइल आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पोहोचली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढू शकतो.


केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात चार टक्क्यांनी वाढ केल्यास ती 46 टक्क्यांवर पोहोचेल. तसेच हा वाढीव भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. केंद्र सरकार वेळोवेळी आपल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DR) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सुटका (DR) मध्ये वाढ करते. त्यात वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये महागाईनुसार सुधारणा केली जाते.

यापूर्वी जानेवारीत डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी DA ची गणना औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते. यासाठी एक निश्चित सूत्र आहे.
पगार किती वाढणार ?

डीएमध्ये चार टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के होईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा 36,500 रुपये मूळ वेतन मिळत असेल, तर सध्या त्याचा DA 15,330 रुपये आहे. जुलै 2023 पासून डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 16,790 रुपये होईल.

यासोबतच जुलैपासून थकबाकीही मिळणार आहे. त्याचप्रमाणे, जर पेन्शनधारकाची मूळ पेन्शन 10,000 रुपये असेल, तर त्याचा DR 4,600 रुपये होईल. कॅबिनेट सचिव स्तरावरील मूळ वेतन अडीच लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत त्याच्या डीएमध्ये एकूण 10,000 रुपयांची वाढ होणार आहे.