गारगोटी (प्रतिनिधी) : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याने कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा केला. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रणच दिले नाही. यावरून सत्तारूढ आघाडीचे ‘गरज सरो व वैद्य मरो’ हे धोरण निदर्शनास येत असल्याची टीका भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केली आहे.

पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता बिद्री कारखान्याने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारला. कारखान्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. बिद्रीच्या संचालक मंडळात भाजपाचे ५ संचालक प्रतिनिधीत्व करतात. या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात या ५ संचालकांनी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील व  समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रण देण्याबाबत चर्चा करायला हवी होती पण या संदर्भात तेथे कोणतीही चर्चा झालेली दिसत नाही.

खरे तर ४ वर्षांपूर्वी बिद्रीची निवडणूक भाजपाबरोबर युती करुन जिंकली असताना भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना अशा चांगल्या कार्यक्रमांना बोलावणे आवश्यक आहे. पण निवडणूकीत युतीसाठी आग्रही असणाऱ्या सत्तारूढ नेत्यांना निवडणूकीनंतर मात्र आमच्या नेत्यांचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो, अशी टीका करण्यात आली आहे.