कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रभू श्रीराम नवमीचा दिवशीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा तिथीनुसार वाढदिवस येतो. मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्ते ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांशी दिवसभर मतदानासाठी संपर्क साधत होते. या संवादात कार्यकर्ते मुश्रीफांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीच्या विजयाचे आवाहन करीत होते. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात हे चित्र दिसत होते. कार्यकर्ते जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना घरातून करावयाच्या मतदानाची प्रक्रिया समजावून सांगतानाही दिसत होते.

याबाबत अधिक माहिती अशी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या तीन आठवड्यामध्ये झालेल्या प्रचार सभांमधून जाहीर आवाहन केले होते की, “बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी माझा वाढदिवस येत आहे. त्यादिवशी मी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेन. परंतु; या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना व दिव्यांग नागरिकांना घरातूनच मतदान करण्याची सोय केली आहे. अशा ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी पोहोचून प्रा. संजय मंडलिक यांच्या खासदारकीचा संकल्प जाहीर करा”.

तसेच; कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या नियोजनाच्या बैठकीत केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने यांनीही आवाहन केले होते की, लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचे सांगितले.

तसेच सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील प्रमुख कार्यकर्ते सरपंच दत्ता पाटील, उपसरपंच कृष्णात मेटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदा दत्तु गोनुगडे (वय ९०) या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचा संकल्प सोडला.