पुणे (प्रतिनिधी) : वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रिडींग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रिडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल व महावितरणमध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांना काम मिळणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला आहे.

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये आयोजित सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली मंडलनिहाय मीटर रिडींग एजन्सी कंत्राटदारांच्या बैठकीत नाळे बोलत होते.

यावेळी अधीक्षक अभियंता (संचालन) शंकर तायडे,  पंकज तगलपल्लेवार (गणेशखिंड मंडल), उपमहाव्यवस्थापक (आयटी),  एकनाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत मीटर रिडींगमध्ये होणाऱ्या चुका व सदोष रिडींगबाबत उदाहरणांचे सादरीकरण करून विविध उपाययोजनांबाबत नाळे यांनी निर्देश दिले.

नाळे पुढे म्हणाले की, महावितरणने वीजमीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे सुरु केल्यानंतर मीटर रिडींगमध्ये अचूकता आली आहे. वीजग्राहकांना मीटर रिडींगचे अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मात्र, एजन्सीजच्या कामचुकार व निष्काळजीपणामुळे मीटरच्या रिडींगमध्ये सदोषता किंवा चुका आढळून येत आहेत. त्यासाठी मीटर रिडींगची पडताळणी करण्यासाठी सरासरी ५ टक्के मीटर रिडींगची तपासणी व पर्यवेक्षण करण्यात येत आहे. यापुढे मीटर रिडींगमध्ये हेतुपुरस्सरपणे सदोष किंवा चुका केल्यास संबंधित एजन्सीला आर्थिक दंड लावण्यासह काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे प्रादेशिक विभागासह महावितरणच्या कार्यक्षेत्रात कुठेही मीटरच्या रिडींगचे कंत्राट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला सहायक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) माधुरी राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) राहुल पवार तसेच कार्यकारी अभियंता, इतर अधिकारी आदी उपस्थित होते.