कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघ गेल्या ४२ वर्षांपासून भाजपकडे आहे. या मतदारसंघात मी दोन वेळा नेतृत्व केल्याने, माझी ताकद मोडून काढण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न करत आहेत. भाजपचा उमेदवार पराभूत होणे म्हणजे चंद्रकांत पाटील यांचे नाक कापले जाईल, असे विरोधकांना वाटत आहे. यामुळे शरद पवारांनी माझ्या विरोधात सुपारी ठेवली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मंत्री जयंत पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना माझ्यावर बोलल्याशिवाय चैन पडत नाही, असा आरोपही त्यांनी केला.   

जयसिंगपूर येथे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले,  मला मंतीमंद आणि मनोरुग्ण म्हणतात. मी सुसंस्कृत असून मला त्यांच्यावर काहीही बोलायचे नाही, तर मी करुन दाखवणार आहे. आम्ही काय केले, असे वारंवार विरोधक विचारत आहेत. आण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १४० कोटींचे कर्ज मराठा समाजाला मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. याबरोबर आम्ही काय केले, ते राज्याला माहीत आहे. यांना सांगण्याची गरज नाही. आता विरोधकांनी ७४ वर्षाचा उमेदवार रिंगणात उभा केला आहे. आमचा ४७ वर्षाचा उमेदवार आहे, असेही यावेळी ते म्हणाले.